भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा पदवीधरांसाठी ‘नऊ कलमी’ अजेंडा जाहीर!

Smita Jadhav | पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी पदवीधर तरुणांच्या रोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेसाठी नऊ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रचाराच्या प्रारंभावेळी त्यांनी शिक्षणानंतर रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी, महिलांची सुरक्षितता आणि मानसिक आरोग्य अशा विविध विषयांवर लक्ष केंद्रित केले. या माध्यमातून नवपदवीधरांसह करिअरच्या मधल्या टप्प्यात असलेल्या व्यक्तींनाही मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

डॉ. स्मिता योगेश जाधव

डॉ. स्मिता जाधव यांच्या कार्यक्रमात उद्योगांना आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देणारी केंद्रे उभारणे आणि तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांमध्ये उद्योजकता व इन्क्युबेशन सेंटर्स विकसित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, विद्यार्थ्यांना नव्या करिअर क्षेत्रांची माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी ५८ तालुक्यांमध्ये करिअर कौन्सिलिंग केंद्रांची सुविधा निर्माण करण्याचे नियोजन आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे, मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये जावे लागते. तेथे अनेक विद्यार्थ्यांना मर्यादित जागेत राहण्याची वेळ येते. ही अडचण लक्षात घेऊन प्रत्येक तालुक्यात दर्जेदार स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे उभारण्याची भूमिका त्यांनी मांडली. याशिवाय, शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपच्या संधी मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले जातील. प्रत्यक्ष उद्योगांमध्ये काम केल्यामुळे विद्यार्थ्यांना कामाचे स्वरूप समजून घेता येईल आणि भविष्यातील करिअरची दिशा ठरवणे सोपे होईल.

Smita Jadhav | महिला सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि पारदर्शक कारभार :

नोकरीसाठी घरापासून दूर राहणाऱ्या महिलांना सुरक्षित निवासाची सुविधा मिळावी, यासाठी आधुनिक सोयींनी युक्त सुरक्षित वसतिगृहे उभारण्याचे आश्वासन डॉ. जाधव यांनी दिले. तसेच, घरून काम करण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती आणि वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांची आवश्यकता असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्यात समन्वय साधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमातून कामाच्या पर्यायी संधी वाढवण्यावर भर असेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *