सुट्या मसाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्री बंद होणार? आता नवी मागणी चर्चेत, IAS तुकाराम मुंढे काय निर्णय घेणार?

अन्न व औषध प्रशासनाने सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. आता सुट्या मसाल्यांबाबत एफडीएने नवीन नियमावली जारी केली आहे. मसाल्यात रंग टाकल्यास कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. सुटया मसाल्यानंतर आता ऑनलाइन औषध विक्री बंद करण्याची मागणी पुढे आली आहे. आता केमिस्ट असोसिएशनची नवीन मागणी चर्चेत आली आहे. त्यांनी ऑनलाइन औषध विक्री बंद करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे म्हणत त्यांनी ही मागणी केली आहे. या मागणीनंतर आता अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
राज्यात ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनने केला आहे. या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनलाइन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाकडे तुकाराम मुंढे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप केलाय. अनेक धोकादायक औषध ही ऑनलाइन पद्धतीने विक्री केली जातात. जी औषधे केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच विक्री केली जावी, असा नियम आहे. त्यानंतरही ती औषधे खुलेआम विकली जात आहेत.
