ही काळ्या दगडावरची पांढरी रेष, नाही देणार ते…रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांना केलं सतर्क

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा भाजपकडे अर्थखात्यासाठी शब्द टाकला आहे. परंतु भाजप अर्थखाते पुन्हा देणार नाही, अशी भविष्यवाणी रोहित पवार यांनी केली आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महायुतीत संघर्ष सुरू असल्याचे दिसत आहे. या संघर्षादरम्यान माजी आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा अर्थखाते द्यावे, अशी मागणी केली आहे. महायुतीच्या बैठकीत सुनेत्रा पवार गटाच्या टिंगरेंनी भाजपकडे अर्थखात्याची मागणी केली. त्यामुळे अर्थखात्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.  भाजपकडे असलेल्या अर्थखात्यावर आता रोहित पवार यांनीही मोठं भाष्य केलं आहे.

अजितदादांच्या निधनानंतर अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले. अजितदादांच्या अपघातानंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादीने अर्थखाते मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप नेत्यांसोबत बैठका घेतल्या. परंतु तोडगा निघाला नाही. अजितदादांच्या निधनाला 9 महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार गटाच्या टिंगरे यांनी अर्थखाते पुन्हा पदरात पडावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. टिंगरे यांनी महायुतीच्या बैठकीतच अर्थखात्याची मागणी केली. या मागणीवर रोहित पवारांनी खोचक प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. अजितदादा गेल्यानंतर भाजपने अर्थखाते चोरून घेतलं. भाजपने हावरटासारखं अर्थखाते घेतलं, अद्याप दिलेलं नाही. ते देणार पण नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.