दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारल्यास कारवाई; आरटीओची विशेष तपासणी मोहीम


पिंपरी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने खासगी ट्रॅव्हल्स बसचालकांकडून मनमानी पद्धतीने जादा भाडे आकारले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. १ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार खासगी बसचालकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) त्याच मार्गावरील समकक्ष बसच्या तिकिटदरापेक्षा ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाडे आकारता येत नाही. मात्र, सणासुदीच्या काळात काही खासगी बसचालकांकडून प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले जाते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आरटीओकडून तपासणी केली जाणार आहे.