7 सेकंदाच्या रील्समध्ये अडकलेल्या तरुणांना तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले; स्क्रोलिंग थांबवून जरा..

नुकत्याच एका कार्यक्रमात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी तरुणाईला मोलाचा सल्ला दिला आहे. तसंच सात सेकंदांच्या रील्समध्ये अडकलेल्यांचीही त्यांनी कानउघडणी केली.

Tukaram Mundhe: सोशल मीडियावर रील्स स्क्रोल करण्यात तासन्‌तास घालवणाऱ्या तरुणांसाठी आयएएस अधिकारी आणि महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महत्त्वाचा संदेश दिला आहे. आजच्या डिजिटल युगात माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध असला, तरी स्वतः विचार करण्याची क्षमता आणि विवेक जपणं अधिक महत्त्वाचं आहे, असं त्यांनी तरुणांना सांगितलं. सोशल मीडियावर सतत दिसणाऱ्या गोष्टी पाहत राहण्यापेक्षा त्यावर विचार करा, स्वतःची ओळख निर्माण करा आणि मेहनतीची तयारी ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं. त्यांच्या या मार्गदर्शनाची तरुणाईमध्ये चर्चा होत आहे.

डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे तरुणांचा स्क्रीन टाइम वाढत असून, एकाग्रतेवरही परिणाम होत असल्याचं तुकाराम मुंढे यांनी अधोरेखित केलं. त्यांच्या मते, आजच्या तरुणांचं लक्ष काही सेकंदांत दुसरीकडे वळतं. त्यामुळे सोशल मीडियावर सतत रील्स पाहण्याऐवजी थोडं थांबून विचार करण्याची सवय लावली पाहिजे. एखादी गोष्ट वारंवार दिसते म्हणून ती खरी मानणं किंवा इतर लोक जे करतात तेच डोळे झाकून स्वीकारणं योग्य नाही. प्रत्येक माहितीची चिकित्सा करणं, प्रश्न विचारणं आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेणं गरजेचं आहे. केवळ माहिती मिळवणं म्हणजे ज्ञान मिळवणं नव्हे, तर त्या माहितीचा योग्य वापर करण्यासाठी विवेकही आवश्यक आहे, असा त्यांच्या संदेशाचा आशय आहे.