अभिजीत दिपके काय निर्णय घेणार? केंद्रीय मंत्र्यांकडून सलग दुसऱ्या दिवशी मोठी ऑफर
abhijeet dipke : अभिजीत दिपके यांना सातत्याने केंद्रीय मंत्र्यांकडून ऑफर दिली जात आहे. एकीकडे दिपके पोलिसांच्या कारवाईचा सामना करत आहेत. दुसरीकडे केंद्रीय मंत्री ऑफर देत आहे. त्यामुळे दिपके काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंच्या टार्गेटवर धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत. ज्ञानेश कुमार हे मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप दिपकेंनी केलाय. त्यानंतर अभिजीत दिपकेंसह इंडिया आघाडी देखील ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दिपकेंना पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे. दिपके यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात धाडण्यात आलं आहे. दिपकेंना एक राजीनामा मिळाला. परंतु दुसऱ्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणे योग्य नसल्याचे म्हणत पुन्हा केंद्रीय मंत्र्यांनी अभिजीत दिपकेंना मोठी ऑफर दिली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे काल धाराशीवच्या दौऱ्यावर होते. त्यांनी काल धाराशिवातून अभिजीत दिपकेंना आरपीआयमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. दिपके खरा आंबेडकरवादी असल्यास माझ्या पक्षात यावे, अशी ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली होती. धाराशिवनंतर आज रामदास आठवले लातूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातही रामदास आठवलेंनी माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दिपकेंना पुन्हा मोठी ऑफर दिली आहे. ‘अभिजित दिपके रिपब्लिकन पक्षात आल्याने पक्ष सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना घेऊन व्यापक होईल, असं आठवलेंनी म्हटलं. एक राजीनामा मिळाला, आता दुसरा राजीनामा मागण्यासाठी सातत्याने आंदोलने करणे हे काही योग्य नाही, असा सल्लाही आठवले यांनी अभिजित दिपके यांना दिला आहे. आंदोलनांनी सरकार बदलता येणार नाही, असंही आठवले म्हणाले आहेत.
