तुम्हालाही रात्री शांत झोप लागत नाही? मग सावधान! होऊ शकतो गंभीर परिणाम

Sleep Deprivation | आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा व्याप, अभ्यासाचा ताण आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याची सवय यामुळे अनेकांच्या झोपेवर परिणाम होत आहे. काही जण दररोज केवळ ५ ते ६ तास झोप घेऊन त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, सतत अपुरी झोप घेतल्याने रक्तदाब, हृदयाचे आरोग्य आणि शरीरातील चयापचय प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे झोपेचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

दररोज किती तास झोपणे आवश्यक आहे? :

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या माहितीनुसार, पुरेशी आणि शांत झोप हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असते. प्रौढ व्यक्तींनी दररोज रात्री किमान सात तास झोप घेण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या दिवशी कामामुळे झोप कमी झाली, तर त्यापेक्षा रोजच कमी वेळ झोपण्याची सवय आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे झोपेच्या वेळेकडे दुर्लक्ष न करता नियमित दिनक्रम पाळणे आवश्यक आहे.

झोपेचे महत्त्व ठरवताना केवळ किती तास झोप घेतली, एवढाच विचार पुरेसा नसतो. झोप सलग लागते का, रात्री वारंवार जाग येते का आणि सकाळी उठल्यानंतर शरीराला ताजेतवाने वाटते का, या बाबीही लक्षात घेणे गरजेचे आहे. रात्री सात ते आठ तास अंथरुणावर असूनही थकवा जाणवत असेल, तर झोपेच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. झोप लागण्यासाठी बराच वेळ लागणे, रात्री अनेकदा जाग येणे किंवा सकाळी आळस जाणवणे ही अपुऱ्या अथवा अस्वस्थ झोपेची संभाव्य लक्षणे आहेत.